‘बालभारती’ची ई-बुक्स ऑनलाइन
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने अर्थातच 'बालभारती'ने ई-बुक्सच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. 'बालभारती'ची सर्व पुस्तके टप्प्याटप्प्याने ऑनलाइन उपलब्ध होणार असून, त्यासाठीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. 'बालभारती'च्या http://ebalbharati.in/ या नव्या वेबपोर्टलवरून ही पुस्तके विद्यार्थ्यांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 'बालभारती'च्या सर्व सुविधा ऑनलाइन करण्याची घोषणा नुकतीच केली होती. शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नेमलेल्या समितीनेही या पुढील काळात विद्यार्थ्यांसाठी ई-बुक्स उपलब्ध करून देण्याची सूचना आपल्या अहवालातून राज्य सरकारकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर 'बालभारती'मध्ये त्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा 'मटा'ने आढावा घेतला.
यापूर्वीच्या ई-बुक्सचा एकूण आकार अत्यल्प करण्यात येणार असून, त्या योगे ही पुस्तके सहजगत्या डाउनलोड होण्यास मदत होणार आहे. या वेबसाइटवरून सर्वशिक्षा अभियानांतर्गत शिक्षण खात्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पुस्तकांची नोंदणी यापुढे ऑनलाइन केली जाणार आहे. तसेच, पुस्तक विक्रेत्यांसाठीची पुस्तक खरेदीची सुविधाही ऑनलाइन माध्यमातून केली जाणार आहे. पुस्तकांच्या वितरणासाठीची ट्रॅकिंग सिस्टिम आणि संस्थेच्या 'किशोर' या मासिकाची नोंदणीही या पुढे ऑनलाइनच होणार असल्याचे या नव्या वेबसाइटच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.
विद्यार्थ्यांसाठी अधिकृत ई-कंटेंट तयार करणे गरजेचे आहे. आम्ही ई- बालभारतीच्या माध्यमातून असे सर्व प्रकारचे ई-साहित्य उपलब्ध करून देऊ. त्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर आदी ज्येष्ठ वैज्ञानिकांचे मार्गदर्शन घेतले जाईल. - विनोद तावडे, शिक्षणमंत्री
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा